राष्ट्रीय पारितोषिक विजेता लेखक,
सुप्रसिद्ध चित्रकार, नाटककार, कार्टूनिस्ट. खरंतर एका जन्मासाठी माणसाची एवढी ओळख
पुरेशी आहे. किंबहुना जास्तच आहे निवृत्तीनंतरच आयुष्य आठवणी काढत जगायला. पण अबीद
सुरती हा माणूस असा स्वस्थ बसणारा नाही. खरंतर आपल्याकडे कुणीच स्वस्थ बसत नाही.
नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करत बसणे हाच उद्योग असतो खूप लोकांचा. पण स्वस्थ न
बसणारा प्रत्येक माणूस अस्वस्थ असतो असं नाही. अबीद सुरती मात्र अस्वस्थ होते.
मित्रांच्या घरातल्या बेसिनच्या नळाची टपटप त्यांना अस्वस्थ करायची. समाज
सुधारायच्या गप्पा करणारे लोक साधा घरातला नळ दुरुस्त करत नाहीत महिनोनमहिने ही
गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. म्हणून ते उपदेश करत बसले नाहीत. एका सकाळी
प्लंबरला सोबत घेऊन ते निघाले नळ दुरुस्तीच्या मोहिमेला. आणि त्या दिवसापासून अबीद
सुरती गेली कित्येक वर्षं दर रविवारी हे काम स्वखर्चाने करतात.
रस्त्याच्या कडेला
अतिशय गरिबीत बालपण गेलेले अबीद सुरती पाण्याचं महत्व जाणून होते. तासनतास आई एक
हंडाभर पाण्यासाठी कशी रांगेत उभी राहायची हे त्यांनी बघितलं होतं. म्हणून
पाण्याचा थेंब जरी वाया गेला तरी ते अस्वस्थ होतात. पण आज पाणी टंचाई आहे म्हणून
सगळे जसे अश्रू ढाळत बसलेत तसं त्यांनी केलं नाही. किंवा लोक जमवून भाषण देत बसले
नाही. drop डेड फौंडेशन ही त्यांची संस्था म्हणजे वन man आर्मी आहे. दर रविवारी एक
प्लंबर आणि एक सहायक स्त्री सोबत घेऊन ते नवीन अपार्टमेंट मध्ये जातात. लोकांच्या
परवानगीने त्यांच्या घरातले नळ दुरुस्त आहेत का ते तपासतात. लिकेज असेल तर ते बंद
करून दिलं जातं. अशा प्रकारे अबीद सुरती या एका माणसाने आजवर लाखो लिटर पाणी
वाचवलं आहे. आणि तेही एकट्याच्या बळावर , अगदी कमी खर्चात. ही खूप मोठी जलक्रांती
आहे.
पाण्याचे वाया जाणारे
थेंब वाचवणं हे दुखी माणसाचे अश्रू पुसण्याएवढच महत्वाच काम आहे.
शाहरुख खानच्या शब्दात
सांगायचं तर अबीद सुरती देवदूत आहेत.
No comments:
Post a Comment