सरस्वती काकडे. औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसी जवळ गंगापूर नावाच्या गावात एकट्याच राहतात. एमआयडीसी साठी त्यांची चौदा एक्कर जमीन १९९६ साली ताब्यात घेतली गेली. आणि पाच सहा वर्षापूर्वी मोबदला दिला तो पण फक्त साडे चार लाख. त्यांच्या तरुण मुलाला हा धक्का सहन झाला नाही. घरदार विकून त्याने दुसरीकडे दोन एक्कर शेती घेतली. पण चौदा एक्कर बागायती शेतीचा मालक दुसऱ्या गावात जाऊन दोन एक्कर शेतीत राबता राबता निराश झाला. त्याने आत्महत्या केली. त्याचा बापाने धसका घेतला. ते आजारी पडले. वारले. सरस्वती काकडे यांच्या सुनेने अग्नी दिला सासऱ्याला. घरात पुरुष उरला नाही. सुनेला तीन मुली आहेत. सून एका गावात मोल मजुरी करून मुली सांभाळतेय. आणि सरस्वती काकडे एकट्या गंगापूर मध्ये राहतात. जवळच त्यांची बळजबरी ताब्यात घेतलेली चौदा एक्कर जमीन आहे. गेली एकोणीस वर्षं त्या जमिनीवर कुठलीच कंपनी उभी राहिली नाही. जमीन मात्र नापीक करून मोकळे झाले सरकार. शेतात थेट जेसीबी घुसवून उभं पिक उध्वस्त केलं गेलं डोळ्यादेखत. जमीन ताब्यात घेऊ नये म्हणून सरस्वतीबाई शेतात उभ्या राहिल्या तर त्यांना ढकलून दिलं गेलं. तेंव्हापासून त्यांचा एक हात निकामी झाला. कालच भेटलो त्यांना. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. चांगल्या वकिलांनी त्यांच्यासाठी लढायला हवं.
No comments:
Post a Comment