Total Pageviews

Saturday, July 23, 2016

प्रत्येक जातीवर होवो बलात्कार गळा घोटून.
प्रत्येक आडनावाचा होवो गर्भपात 
उलटी यायच्या आधीच. 
प्रत्येक जातीपातीच्या नावाने गळे काढणाऱ्या नेत्याच्या गळ्यात
अडको ह्डूक
त्याच्यासारख्याच लूत भरल्या कुत्र्याचं.
मंत्रीपदासाठी लाळ घोटत फिरत असतात
जात दावणीला बांधून...जनावरासारखी.
मेख नेमकी कुठे मारायची हे कुठल्याच जनावराला ठरवता येत नाही.
म्हणून जातीचा खुंटा होऊ नये बळकट.
भीतीवर चर्चा करायची तर जातीवर चर्चा करतात.
कोण म्हणतोय मुलगी वाचली पाहिजे?
थोबाड फोडा त्याचं.
साल्या कशाला वाचली पाहिजे?
मुली वाचवा म्हणून करोडोंच्या जाहिराती करणाऱ्या देशा
मुलीला कुणाकुणा पासून वाचवशील?
प्रत्येक पोरगी परी असते बापासाठी
प्रत्येक परीला पंख मिळू दे
लवकरात लवकर हा क्रूर देश सोडण्यासाठी.
कदाचित म्हणूनच परीला खूप पूर्वीपासून पंख असतील पुस्तकात.
गाई एवढीच बाईला किंमत मिळो
वेळोवेळी जातीपातीने शेण खाण्याची वेळ येऊ नये म्हणून.
सगळ्याच लेकी असोत माणसाच्या
बातमी असू नये बलात्कार करणाऱ्या माणसाच्या जातीची
ठळक अक्षरात असो तारीख त्याच्या मातीची.
मी नक्की येईन
माझं एक राहून गेलंय
मी कधीच भटक्या कुत्र्यांना काहीच खाऊ घातलं नाही.
-- अरविंद जगताप.

1 comment:

  1. Ak katu satya. A devoted blogsite create karun phar changle kele Arvind Bhau. Thanks!

    ReplyDelete